मंजिरी संदीप घरत, M Pharm,FFIP, Dombivli त्यांचे फार्मसीचे शिक्षण युडीसीटी,माटुंगा,मुबई येथे बी फार्म आणि एम. फार्म १९९० मध्ये झाले. त्यानंतर ३ वर्ष (1990 – 1993) त्यांचे पतीसोबत अमेरिकेत वास्तव्य होते ,जिथे त्यांनी मार्केटिंग मधील वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या तेथून मायदेशी परत आल्यावर फार्मा कंपनीत संशोधन विभागात काम केले आणि १९९६ पासून त्या कुंदनानी फार्मसी पॉलीटेक्नीक येथे नोकरीस आहेत. अमेरिकेतील औषध दुकाने ,तेथीक समाजात असलेली आरोग्य विषयक आणि औषध विषयक जागृती हे पाहून भारतातही असे परिवर्तन व्हावे हि मनात सुप्त इच्छा आणि प्रेरणा अमेरिकेतून परत आल्यापासूनच त्यांना होती. या दिशेने काम करण्याची संधी त्यांना २००२ पासून हळूहळू मिळत गेली.
सध्या त्या कुंदनानी फार्मसी पॉलिटेक्निक,उल्हासनगर,येथे प्र. प्राचार्य, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या (आयपीए)राष्ट्रीय उपाध्यक्ष,इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनच्या (एफआयपी) उपाध्यक्ष आणि एफआयपीच्या एएमआर कमिशनच्या(प्रतिजैविक प्रतिरोध कमिशन )प्रमुख आहेत. त्या आरोग्यसेवेतील फार्मासिस्टच्या भूमिकेच्या प्रबळ समर्थक आहेत, फार्मासिस्टची भूमिका सक्षम आणि व्यापक करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांचे अनेक उपक्रम आणि योगदान आहे.
गेल्या दोन दशकांपासून फार्मसी शैक्षणिक क्षेत्रात पूर्णवेळ नोकरीबरोबरच त्या कम्युनिटी फार्मसी (Retail औषध दुकाने)आणि पब्लिक हेल्थ या क्षेत्रात “लोकल ग्लोबल”पातळीवर काम करत आहेत.फार्मसी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शैक्षणिक प्रयोग करून, त्यांना विविध फार्मसी प्रकल्पांमध्ये सामील करून घेऊन विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणे आणि त्यांना लहान वयात आरोग्यक्षेत्राची उत्तम जाण यावी यासाठी त्या प्रयत्नशील असतात. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या फार्मसी अभ्यासक्रम विषयक अनेक समित्यांमध्ये त्यांनी काम केले आहे,शिवाय कौन्सिलतर्फे देशातिल अनेक फार्मसी संस्थांची तपासणी करण्याची जबाबदारीही त्या पार पाडतात.
शैक्षणिक संस्था,व्यावसायिक संस्था, स्टेट फार्मसी कौन्सिल,केमिस्ट असोसिएशन,फार्म कॉर्पोरेट,शासनाचा आरोग्य विभाग ,अन्न आणि औषध प्रशासन,विद्यार्थी संघटना ,माध्यमे, ग्राहक संघटना या सर्वांसोबत त्यांचे काम चालू असते. फार्मासिस्टच्या प्रशिक्षणासाठी त्या नियमित प्रशिक्षक आहेत,शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्क्रमात कम्युनिटी फार्मासिस्टना सामील करून घेऊन आयपीएतर्फे “पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप” मॉडेल त्यांनी विकसित केले आहे, फार्मासिस्टसाठी हा भारतातील अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण आणि अतिशय समाजहिताचा पहिलाच उपक्रम आहे. याच संदर्भात त्यांनी राज्य आणि केंद्र शासन ,जागतिक आरोग्य संघटनेसोबतही काम केले आहे.कम्युनिटी फार्मसीच्या क्षेत्रात आयपीएच्या अनेक प्रकल्पांचे नेतृत्व करतात. त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये नियमित वक्ता आणि पॅनेलिस्ट आहेत आणि त्यामुळे त्यांचे एक मोठं “ग्लोबल” नेटवर्क फार्मसीच्या क्षेत्रात तयार झाले आहे.औषध साक्षरता हि संकल्पना मांडून समाजात ती रुजावी आणि औषधांचा जबाबदारीने वापर व्हावा यासाठी त्या सक्रिय आहेत.त्या स्तंभलेखिका असून त्यांची मराठीतील विविध वृत्तपत्रात, नियतकालिकांमध्ये लिखाण केले आहे. औषधभान आणि आरोग्यनामा ही त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्या इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन च्या (आयपीए) औषधसाक्षरता मोहिमेचे नेतृत्व करतात.
त्यांना विविध राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.त्यातील काही खालीलप्रमाणे : वर्ष 2016 मध्ये ब्युनोस आयर्स येथे एफआयपी फेलो पुरस्कार, मनिला येथे 2018 मध्ये एफएपीए (फेडरेशन ऑफ एशियन फार्मासिस्ट असोसिएशन)चा इशिदाते पुरस्कार, (हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी त्या भारतातील पहिल्याच आणि एकमेव महिला फार्मसी व्यावसायिक आहे.),भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून प्रोफेशनल असोसिएशन साथीचा पुरस्काराचा ” सर्वोत्कृष्ट प्रोफेशनल पुरस्कार ,2021 मध्ये नवी दिल्ली येथे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते त्यांना मिळाला, 2023 मध्ये नागपूर येथे आयपीएकडून फार्मसी प्रोफेशन मधील भरीव कार्यनिम्मित प्रा.एम.एल.खुराणा स्मृती पुरस्कार त्यांना केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मिळाला .२५ हून अधिक देशांना त्यांनी कामासाठी भेटी दिल्या आहेत.
कुटुंब आणि कॉलेजमधील नोकरी सांभाळून स्वयंप्रेरणेने मानद(honarary)स्वरूपात त्यांचे कार्य चालू आहे.Woman on A mission असे त्यांचे वर्णन एका प्रसिद्ध इंगजी वर्तमानपत्राने २००७ मध्ये केले होते.
0 Comments
Leave a comment