।। श्री ।।
जन्मशताब्दी वर्ष
नोटेशन पुस्तके लेखक – कै. श्री. चंद्रकांत गंगाधर साने
१७.०९.१९२४ ते २३.१०.२०११
माहिती
चंद्रकांत गंगाधर साने, हे कै. गंगाधर रामचंद्र साने, मूळ बार्शीचे शेती करणारे, परंतु पुढे BA BT ही पदवी प्राप्त करुन, पुण्यास वास्तव्यास आलेल्या, पुण्यातील गोपाळ हायस्कूल उभारणीत मोठा वाटा, इंग्रजीची नोकरी न करण्याचा निश्चय, अशा कै. गंगाधर सान्यांचे कनिष्ठ चिरंजीव. गंगाधर पंत पगाराच्या पैशातून, हुंडाविरोधी पुस्तके, छ. शिवाजी राजांवरील पुस्तके प्रकाशित करत.
लहानपणापासूनच चंद्रकांत साने यांना आणि त्यांचे ज्येष्ठबंधू कै. शरदचंद्र साने यांना संगीताची आवड होती, चंद्रकांत साने संवादिनी आणि शरदचंद्र साने बासरीमध्ये असे दोघेही तरबेज होते. या आवडीमुळेच जुन्या ब्रह्मचारी सिनेमातील ‘यमुनाजळी खेळू खेळ कनैया’ या गाण्याची चाळ व सुरुवातीचे संगीत (music) पाठ करण्यासाठी ते ‘प्रभात’ थिएटर मागे १६ वेळा उभे राहून ते गाणे आणि त्यातील संगीत पाठ केले व घरी आल्यावर त्याचे नोटेशन काढले, तेही लहानवयात. अशी संगीताची गोडी उपजत होती. अशा ह्या गानवेड्या रसिकाला मॅट्रिक झाल्यावर सरकारी खात्यात, DIC (District Industrial Centre) मध्ये नोकरी मिळाली. त्यांची पत्नी कै. विजयाताई साने यांनी वेळप्रसंगी आपले दागिने मोडून, परीक्षेची फी भरण्यासाठी आणि पदवी प्राप्त झाली तर पगारवाढ होईल हा हेतू डोक्यात ठेवून प्रोत्साहित केले. कालांतराने BA (स्पे) पदवी प्राप्त तर झालीच, पण पुढे जनरल मॅनेजर पदावरुन DIC मधून निवृत्त झाले. थोरल्या बंधंकडून (कै. शरदचंद्र साने) शास्त्रीय शिक्षणाचे धडे मिळाले.
संवादिनी वाजवण्याबरोबरच गायन, बुळबुळ तरंग वाजवणे, काव्य करणे, चित्रकला, फोटोग्राफी, संगीत नाटकांमधून भूमिका करणे अशा अनेक कला अवगत होत्या. त्यामुळेच कै. सरदार आबासाहेब मुजूमदरा, कै. ग. दि. माडगुळकर, कै. भालबा केळकर अशा अनेक थोर व्यक्तींनी त्यांच्या कलेचे कौतुक केले आहे.
संवादिनी म्हणजे प्रिय. ती वाजवायला अनेक जणांना आली पाहिजे म्हणून नोटेशनवरुन गाणे शिकविणे आणि शिकणे दोन्ही सोपे जाते म्हणून आजपर्यंत २५० मराठी गीते, २०० हिंदी गीते नोटेशनसह लिहिली. त्यात भावगीते, नाट्यसंगीत, बालगीते, लावण्या इ. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गीतांचा समावेश केला. १९९८ साली ‘नितीन प्रकाशन’ चे संस्थापक कै. वसंतराव गोगटे ह्यांच्या पुढाकाराने कै. चंद्रकांत साने यांची आठ पुस्तके प्रकाशित केली. तद्नंतर श्री. नितीन गोगटे ह्यांनी पुढील पुस्तके प्रकाशित करण्याचा भार यशस्वीपणे पेलला. ६/७ वर्षात या पुस्तकांची लोकप्रियता खूपच वाढली, अनेक फोन, अनेक पत्रे, प्रत्यक्ष भेटींमधून (अण्णा) चंद्रकांत साने घराघरात भारतातच काय पण परदेशी ही पुस्तक रुपाने पोचले, ज्याची नोंद या कार्याचा गौरव म्हणून त्यावेळची प्रचलित E TV कडून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी मुंबई अंधेरीला निमंत्रण आले आणि ९ सप्टेंबर २००५ रोजी ही मुलाखत श्री. राजू परुळेकर यांनी घेतली जी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. एखाद्या रसिकाला त्याच्या आवडत्या गाण्याचे नोटेशन पण काढून देत किंबहुना फोनवर /पत्राद्वारे सांगत. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन, पेटीवर सुद्धा ‘मींड’ चा आभास कसा निर्माण करता येतो, वेगळ्या पद्धतीने पेटी वाजवली तर गाण्यातले भाव पेटीवर कसे निघू शकतात ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अशा ह्या नोटेशनच्या पुस्तकांनी पुण्यातील त्या वेळच्या साहित्य संमेलनात विक्रीचा उच्चांक गाठला.
पुण्यामध्ये डहाणूकर कॉलनीमध्ये वास्तव्य असताना १९८५ ते १९९५ मध्ये स्वतः खपून, कष्ट करुन, अनेक सोयी करुन घेतल्या. कचरा गाडी, स्कूल बस, रस्ता क्र., पूर्वी डहाणूकर सर्कलच्या इथे असलेला सोसायट्यांच्या माहितीचा नकाशा, अंतर्गत रस्ते, डांबरीकरण अशी अनेक कामे केली. डहाणूकर कॉलनी फेडरेशन चे १० वर्ष अध्यक्ष होते. ‘साने काका’ नावाने लोकप्रिय होते.
नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वास्तव्य होते. एकटे रहाणे, त्यातूनच गीता, ज्ञानेश्वरी, योगवासिष्ठ, गीतारहस्य, एकनाथी भागवत इ. ग्रंथांचे वाचन, चिंतन, मनन आणि आचरण, अनेक संतांचा सहवास, सेवा, सत्संग घडला. त्यातूनच जवळजवळ ११७ काव्य/अभंगाचा साक्षात्कार होऊन काव्य स्फुरू लागली. ज्याचे ‘भक्ती सुगंध’ पुस्तक उपलब्ध आहे. खुद्द कै. श्री.ग. दि. माडगुळकरांच्या निवासस्थानी २ तासाचा काव्याचा कार्यक्रम दोघा पती पत्नींनी केला. या सर्वामागे नक्कीच दैवशक्तीचा अंश त्यांच्यात होता म्हणून सर्व पूर्णत्वास आले. २०२४ हे त्यांचे शताब्दी वर्ष आहे. तर त्यांनी एक पुस्तक होईल अशी गाणी नोटेशनसह तयार आहेत, पण त्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन नितीन प्रकाशनच्या सध्याच्या पदभार सांभाळणारे मनावर घेतील आणि १७ सप्टेंबर २०२४ ला नवीन पुस्तक सर्व रसिकांच्या भेटीस येईल अशी नक्कीच आशा करु, जेणेकरुन त्यांच्या जन्मदिनी, त्यांना जिथे असतील तिथे आनंद वाटेल.
धन्यवाद.
शद्वांकन – सौ. विनया विनायक साने (स्नुषा)
२४.०३.२०२४
0 Comments
Leave a comment