नितीन प्रकाशनच्या ‘सुगम मराठी व्याकरण–लेखन’ या पुस्तकाचे लेखक ‘कै.मो.रा.वाळंबे’ यांचा जीवन परिचय.
कै.मो.रा.वाळंबे – जन्म 30 जून, 1912 (रामदुर्ग-कर्नाटक) बी.ए.बी.टी. – मृत्यू 12 मार्च, 1992 (पुणे-महाराष्ट्र)
मराठी व्याकरणकार, साहित्यिक विद्यार्थीप्रिय शिक्षक, शिस्तप्रिय व उत्कृष्ट मुख्याध्यापक, विविध विषयावरील लेखन, स्तंभ लेखक
बालपणीच आईचे छत्र हरपिले व वडिलांच्या विमनस्क अवस्थेचे परिणाम म्हणून त्यांचे चुलत बंधूच्या आश्रयाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पण परावलंबित्व त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे मावसभावाबरोबर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले.
काही ओळखीच्या कुटुंबाच्या मदतीने वार लावून जेवणाची सोय झाली. त्या दरम्यान अनेकदा उपासही घडले. अशा परिस्थितीतही काही ‘देवमाणसे’ तिथे भेटली. त्यामुळे कळत-नकळत मनावर चांगले संस्कार झाले. त्याच लोकांनी पुढील शिक्षणासाठी मदत केली. ज्या लोकांनी आश्रय दिला त्यांच्या मुलांच्या शिकवण्या करुन इतरही काही मुलांच्या शिकवण्या घेऊन त्यातल्या अर्थाजनावर ‘बी.टी.’ चा अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यामुळे शिक्षकाची नोकरी मिळाली.
स्वतः उत्तम शिक्षक होऊ हा आत्मविश्वास वाढला. आणि कोल्हापूरातच ‘माध्यमिक शिक्षण वर्गाचे’ शिक्षक म्हणून पुढील वाटचाल चालू केली.
1942 च्या सुमारास ‘न्यू इंग्लिश स्कूल’ सातारा येथे ‘मराठी व इंग्रजी’ या विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले.
सातारा शहरातल्या शाळेच्या निमित्ताने ‘उत्तमोत्तम साहित्यिकांशी’ परिचय झाला. साताऱ्यात ‘उपमुख्याध्यापक’ म्हणून 15 वर्षे जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ‘पुण्यामध्ये’ बदली करुन घेतली. प्रथम काहीवर्षे ‘रमणबाग’ व नंतर ‘टिळकरोड’ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आधी ‘उपमुख्याध्यापक’ नंतर ‘मुख्याध्यापक’ म्हणून जबाबदारी स्वीकारली.
अतिशय कडक शिस्तीचे पण तेवढेच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावाजले गेले.
परंतु त्याचबरोबरीनं लेखन, वाचन हे छंद जोपासले. त्याचबरोबरीने पुण्यामध्ये ‘महा.साहित्य परिषद’, ‘नगर वाचन ग्रंथालय ’, ‘वक्तृत्वोत्तेजक सभा’, ‘वसंत व्याख्यानमाला’, ‘बालभारती’ अशा अनेक संस्थामध्ये जबाबदारीची कामे केली व पदे भूषविली. त्यानंतर ‘टिळकस्मारक मंदिरात मराठी शब्दकोश ‘समितीचे उपसंपादक’ म्हणून काम पाहिले.
सुरुवातीच्या काळात कोल्हापूरला असताना ‘आंग्ल भाषेचे अलंकार’ हे पुस्तक लिहिले. मुलांसाठी ‘सुबोध वाचन’ भाग 1 ते 3 ही पुस्तके लिहिली. शिकारीच्या सत्यकथा हे स्वानुभावावर आधारित कथांचे पुस्तक, ‘वनराणी एल्सा’ हे स्वैर भाषांतरीत पुस्तक मुलांसाठी लिहिले. कोल्हापूरच्या ‘डॉ. बाळकृष्ण यांचे चरित्र’ या नावाचे पुस्तक लिहून ते प्रकाशात आणले.
शाळेत शिक्षक असताना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा ते 10 वी-12 वी च्या मुलांना शिकवीत असत. प्रत्यक्ष शिकवितांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी इ.8 वी ते 10 वी ‘साठी ‘मराठी व्याकरण व शुद्धलेखनावर’ पुस्तके लिहिली. त्यानंतर ज्यु.कॉलेज, एफ्.वाय, एस्.वाय, टी.वाय. आणि बी.ए.चा अभ्यास करणायांसाठी ‘सुगम मराठी व्याकरण-लेखन’ हे पुस्तक लिहिले. त्याच काळात विविध ठिकाणी शुद्धलेखन आणि व्याकरण या विषयांवर व्याख्याने दिली.
मराठी व्याकरणाबरोबरच शुद्धलेखनाबाबतीतही ते अतिशय काटेकोर होते.
शुद्धलेखनाचे नियम, शुद्धलेखनाच्या शंकाचे निरसन व सुमारे 5000 (पाच हजार) शुद्ध शब्दांची सूची असलेले ‘मराठी शुद्धलेखन प्रदीप’ नावाचे पुस्तक लिहिले.
स्थानिक वृत्तपत्रांचे दररोजच्या बातम्यांचे लेखन शुद्ध असावे यासाठी पुण्यातल्या विविध छापखान्यांतल्या कामगारांचे मोफत क्लासेस घेतले.
वयाच्या ‘72-73’ वर्षापर्यंत त्यांनी रोज पुस्तकांची ‘प्रुफे’ तपासून देण्याचा ‘व्यवसाय’ अत्यंत उत्साहाने आणि प्रामाणिकपणे ‘चिकाटीने’ सांभाळला. त्यामध्ये या उतारवयातही न कंटाळता आणि स्वतः त्यात रमत आनंद घेत हा पूरक व्यवसाय करताना एक ‘लोक शिक्षणाचं’, समाजकार्य आपल्या हातून घडत आहे. असा त्यांचा दृष्टिकोन होता.
मूळात कर्नाटकात जन्मल्यामुळे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कानडी भाषेत होऊनसुद्धा पुढे जाऊन मराठी भाषा, व्याकरण, लेखन, शुद्धलेखनाचे ‘आधारस्तंभ’ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जीवन परिचय लिहिणारे दोघे –
( कै.मो.रा.वाळंबे) सरोज सुधीर टोळे (कन्या) व शांताराम मोरेश्वर वाळंबे (सुपुत्र) आहेत.
0 Comments
Leave a comment