लहानपणी मला विमानाचं फारच आकर्षण होतं. त्यामुळे मोठेपणी आपण वैमानिक व्हावं असं मला वाटत होतं. पण पुढे डोळ्यांना चष्मा लागला आणि मला कळलं की जर चष्मा असेल तर वैमानिक होता येत नाही. खरंतर हा गैरसमज होता, पण गंमत म्हणजे या गैरसमजामुळे माझ्या मनातलं वैमानिक होण्याचं आकर्षणही निघून गेलं. हो, पण जिद्द आणि अभ्यासूपणाशी माझी मैत्री तर केव्हाच झालेली होती; त्यामुळे चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेपासून स्पर्धा परीक्षांचं लागलेलं वेड मला अधिक अभ्यासू आणि नेमकेपणाने घडवत गेलं. या वृत्तीमुळे मी दहावीला पुणे विभागात बारावा क्रमांक आणि बारावीलादेखील शेवगावमधून पहिला क्रमांक मिळवू शकले. मात्र थोडक्या गुणांनी बारावीची गुणवत्ता यादी हुकली.
बारावीला मला उत्तम गुण असल्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा कुठल्याही क्षेत्रात प्रवेश मिळू शकत होता. पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून बायोटेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मग या क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न मी पाहिलं. तेही स्वप्न मी पदवीचे शिक्षण घेताना सोडलं. नंतर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातील नामांकित आय एल एस विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे गेल्यावर मी उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याचे ध्येय ठरवले. तो अभ्यास उत्तमप्रकारे सुरु असताना मला यू पी एस सी परीक्षांबाबत कळले. मग मी जिल्हाधिकारी व्हायचे म्हणून यू पी एस सीचा अभ्यास सुरु केला अन् कायद्याचा अभ्यास सोडला. खरंतर करिअरची इतकी क्षेत्रं मी बदलत होते, की त्यामुळे मला भावंड आणि मित्रपरिवारातील लोक खूप चिडवायचे. कोणी म्हणायचे की अरे शास्त्रज्ञ आले, तर कोणी वकील, तर काहीजण कलेक्टर मॅडम आल्या, असं म्हणत आपसात हसायचे. अर्थात याचा मनोमन त्रागा व्हायचा. पण मी मनातली उर्मी कधीच हरवू दिली नाही. उलटपक्षी अशा प्रसंगातून मी अधिकच जागृत व्हायचे.
मी खूप निर्णय बदलले पण जे निर्णय मी नव्याने घ्यायचे ते मी स्वतःच्या मनाने घेतलेले असायचे. अशा या माझ्या प्रथमदर्शनी उनाड वाटू शकणार्या निर्णयांच्या पाठीशी माझे आई आणि वडील मात्र फारच खंबीरपणे उभे असायचे. माझ्या लढाईला त्यांचं बळ होतं. माझ्या पंखांना त्यांचाच आधार होता. माझी महत्वाकांक्षा, जिद्द आणि आशावाद महत्त्वाचा आहेच, मात्र त्यामध्ये आईवडिलांनी दाखवलेला विश्वास सर्वाधिक मोलाचा ठरलेला आहे. त्यामुळेच मी सन 2012 मध्ये यू पी एस सीमध्ये देशात 198 वा क्रमांक मिळवला व आय पी एस झाले.
म्हणूनच मित्रहो लक्षात ठेवा-
मंजिल तो मिल ही जाएगी भटकते ही सही !
गुमराह तो वो है जो घरसे निकलेही नही !
—
तेजस्वी सातपुते | आय पी एस, ए एस पी, परतूर, जि. – जालना (२०१५)
0 Comments
Leave a comment